Tuesday, February 5, 2008

शिकवणी

परवा एक वेगळीच फूटपट्टी मिळाली
त्यामुळे झाला एक नवीनच खेळ सुरू
एकेकाच्या दु:खाची मोजायची फक्त खोली
"भारी-दु:ख-वाल्याची" शोधमोहिम सुरू

सर्वात पहिल्यांदा आपलंच मोजावं म्हटलं
आणि काय सांगू? चांगलं पंचवीस फूट भरलं!!
मग भेटला 'अमक्या', त्याचंही मोजून घेतलं
भलताच कंडम निघाला, दहाच्या पुढे नाही गेलं

ढमक्याचा आकडा मात्र अगदी तिसापर्यंत गेला
ह: दु:खाचा रंग त्याचा अगदिच फिका, सोडून दिला
ओळख-अनोळख झाडून सर्वांची मोजली खोली
पण कोणाचीही 'लेव्हल' आपल्याएवढी नाही भरली

अशीच छाती पुढे काढून मग जगभर हिंडलो
आणि शेवटास एका किना-याला येउन थडलो
समोर पाहतो, तो अथांग विराट समुद्र पसरलेला
त्याक्शणी 'धरतीआई'चा आवाज कानात रुणझुणला

"बेटा, या फूटपट्टीनं का मोजणारेस माझ्या या दु:खाची खोली
आणि कशाला रे मोजायचं? दु:खं तुमची, माझीच ना रे झाली?
लेकरु म्हणुन सांगते ऎक, दु:खाची खोली किती ते नाही बघायचं,
अथांग वाटणा-या दु:खापलिकडेही जमीन असते, एवढं लक्शात ठेवायचं"....

No comments: