Wednesday, June 13, 2012

अंदाज



मी म्हणायचो,
"माझे अंदाज कायमच येतात बरोबर"
ती म्हणायची.
"हट, असं कधी होतं का मुळी खरोखर"

मी म्हणालो, "मनं जुळतील"
ती म्हणाली, "आपोआप? की काही करशील?"

नेमका तेव्हाच नाही आला... अंदाज...
अन घडूनही गेलं....

आता दोघेही आपापल्या ठिकाणी,
एकाच चंद्राकडे नजर लावतो बहुदा...

ती म्हणते "अंदाज ठरले खरे..."
"मनं जुळली, एकाच वेदनेशी..."

एकत्र सुस्कारेही सुटत असतील कदाचित
आता अंदाज मात्र कसलेच लागत नाहीत....

Tuesday, November 3, 2009

गुरुपरीक्षा...

माझा ’तुकडा’ टाचा उंचावत एक दिवस म्हटला मला,
"बाबा, तुझ्याएवढा झालो बरं का!"
मग त्याला पायांवर नीट उभं करता झालो
आणि थोडा खाली झुकून म्हणालो,
"आता बिनत्रासाचा माझ्याएवढा झालास..."
"तुझ्याएवढं व्हायला खुप दिवस लागणार..."
एवढं बोलुन एक सॆल्युट फेकुन गेला
खूप मोठ्ठं झाल्यासारखं वाटलं मला....

अन्यथा...

ती म्हणाली " कवी असतो हळवा
आणि कवी असतो बाळवा"
.
"बावळा म्हणायचय का?"
.
"आम्ही करतो, तुमची उलटपुलट वाक्यं सरळ?"
.
"पण बाळवा म्हणजे???"
.
"तू कवी ना?"

फ़ार दिवस झाले खरं या गोष्टीला...
ती निरागस बाळ शोधत असणार माझ्यामधे...
आणि मी तिच्यात?
जाऊ दे...
नाहीतर स्वत:ला कवी नसतं का म्हणवून घेतलं.....

Thursday, March 6, 2008

पहाट...


त्या उंच कड्याच्या टोकाशी...

पहुडलेलो... आपण दोघेच...

शांत निरव रात्र...

चांदण्या अगदी हाती आलेल्या जणू...

आणि खालची भयाण दरी...

ती कधीच हरवली अंधारात...

तू मी आणि चांदण्या मात्र...

डोळा कधी लागला समजलंच नाही...

डोळे हळुहळू उघडताना...

दिशा उजळू लागल्यात...

खालची खोल खोल दरी...

आता अधिकच भयाण वाटत्ये...

मी धडपडतोय तुला जागवायला...

पण त्याआधीच पसरल्येत सोनेरी किरणे...

तुझे डोळे उघडता उघडता...

खोल दरी प्रकाशाने भरुन गेली कधीच....

सुदर्शन...

कृष्णा...

माझ्याहातुन घडतील शंभर अपराध,

याची योजना तयारच होती तुझी,

फक्त अपराध करणं तेवढं माझ्या हाती...

आम्ही सगळे तुझीच रुपं ना रे?

मग हा सर्व खेळ मांडलासच कशाला?

अन त्यातही मी असला रडका गडी का?

कदाचित एक इशारा द्यायचा असेल तुला,

माझ्या उदाहरणावरुन... हा खेळ खेळणा-यांना...

पण मग यासाठी माझीच निवड का?

छे!छे! राग, दु:ख, व्यथा काहिच नाही...

निव्वळ पडले काही प्रश्न.... म्हणून...

खरंतर एक सुख अर्जुनालाही नाही लाभलं...

फार कमी जणांसाठी, देवा तुझं सुदर्शन धावलं...

असं तुझं 'सुदर्शन'... ते तर फक्त मलाच झालं....

Saturday, February 9, 2008

ऋणानुबंध

शाळेच्या ग्राउंडमधला एक मोठ्ठा दगड...

लपाछपी खेळताना राज्य घ्यायची जागा,
पिंट्याला ’राज्य घे राज्य’ म्हणून तिथेच रडवलेलं...

लोखंडे बाईंचा पहिला प्रसाद मीच खाल्लेला,
त्याच दगडावर आख्या शाळेसमोर पूर्ण दिवस अंगठे धरुन मी उभा...

काडेपेट्यांचे छाप, नाणी, तिकीटं, पेनं, बिल्ले,
यांच्या समजुतदार देवाणघेवाणीचा तोच साक्षीदार...

आणि हो!! पिंकी घरी जाताना, तिला त्याच्याआडूनच तर बघायचो
,तिलाही ते माहित असल्याचं, मला फार उशीरा कळलं...

आता शाळा renovate केल्ये, परवाच जाउन बघुनसुद्धा आलो...
त्या दगडाच्या जागी आता, संगमरवरी कट्टा केलाय...

संगमरवर गुळगुळीत असतो आणि दगड खडबडीत,
बघितल्यावर वाटतंय असं उगीच वाटायचं मला याआधी....

Tuesday, February 5, 2008

बाप

दोघांत अगदी गाढ मैत्री, एकमेकांना ’अरे-तुरे’ करायचे
छोट्या-मोठ्या कारणांवरुनसुद्धा गमतीत भांडायचे

"चल येतोस का पिक्चरला" विचारलं पोरानं बापाला
"नको रे,आज त्यापेक्शा दुसरीकडे जाउ भटकायला"

"पप्पा,असं काय रे करतोस, काय झालंय आज तुला ?
छान पिक्चर ऎवजी कशाला ते जायचं भटकायला?"

शेवटी चकित पोरगा आणि बाप गेले एकदाचे टेकडीवर
"आता आपण इथेच बसुयात,मावळंत नाही जोवर"

"पडतो का रे प्रश्न तुला? की तुला असं का वाढवलं?
तिसाचं अंतर असुनही तुला मित्रासारखं का वागवलं?"

आता थट्टा करणारा पोरगाही विचार करु लागला
'खरंच वीस वर्षात हा प्रश्न नाही पडला कधी मला?'

"ऎक,माझे वडीलही अत्यंत कर्तबगार,हुशार होते
पण त्याहुनही कितीतरी अधिक तापट,संतापी होते

कधीकधी तर ते मला अगदी 'रींगमास्टर'सारखे वाटायचे
आमच्या घरातले सगळे 'प्राणी' त्यांच्या तालावर नाचायचे

मी ठरवलं, झालोच तर अतिशय प्रेमळ बाप होईन
मला न मिळालेली सुखं माझ्या मुलाला नक्की देईन

नंतर घर सोडलं,जगात फ़िरलो,फ़िरताना कधी आपटलो सपाटून
कधी स्वखुषीने उठलो,कधी उठावंच लागलं,ध्येयांचा आधार घेउन

पण यशस्वी होऊन इथवर आलो,तरी तुझा आधार लागतो
कारण...कारण बेटा तुझ्यामधे मी, जणु स्वतःलाच पाहतो"

पलिकडे थोडं अंधारुन आलं, थोडा संधिप्रकाशहि होता
त्याला आज समजलं, त्याचा पप्पा खरंच "बाप" होता...