दोघांत अगदी गाढ मैत्री, एकमेकांना ’अरे-तुरे’ करायचे
छोट्या-मोठ्या कारणांवरुनसुद्धा गमतीत भांडायचे
"चल येतोस का पिक्चरला" विचारलं पोरानं बापाला
"नको रे,आज त्यापेक्शा दुसरीकडे जाउ भटकायला"
"पप्पा,असं काय रे करतोस, काय झालंय आज तुला ?
छान पिक्चर ऎवजी कशाला ते जायचं भटकायला?"
शेवटी चकित पोरगा आणि बाप गेले एकदाचे टेकडीवर
"आता आपण इथेच बसुयात,मावळंत नाही जोवर"
"पडतो का रे प्रश्न तुला? की तुला असं का वाढवलं?
तिसाचं अंतर असुनही तुला मित्रासारखं का वागवलं?"
आता थट्टा करणारा पोरगाही विचार करु लागला
'खरंच वीस वर्षात हा प्रश्न नाही पडला कधी मला?'
"ऎक,माझे वडीलही अत्यंत कर्तबगार,हुशार होते
पण त्याहुनही कितीतरी अधिक तापट,संतापी होते
कधीकधी तर ते मला अगदी 'रींगमास्टर'सारखे वाटायचे
आमच्या घरातले सगळे 'प्राणी' त्यांच्या तालावर नाचायचे
मी ठरवलं, झालोच तर अतिशय प्रेमळ बाप होईन
मला न मिळालेली सुखं माझ्या मुलाला नक्की देईन
नंतर घर सोडलं,जगात फ़िरलो,फ़िरताना कधी आपटलो सपाटून
कधी स्वखुषीने उठलो,कधी उठावंच लागलं,ध्येयांचा आधार घेउन
पण यशस्वी होऊन इथवर आलो,तरी तुझा आधार लागतो
कारण...कारण बेटा तुझ्यामधे मी, जणु स्वतःलाच पाहतो"
पलिकडे थोडं अंधारुन आलं, थोडा संधिप्रकाशहि होता
त्याला आज समजलं, त्याचा पप्पा खरंच "बाप" होता...