Tuesday, February 5, 2008

उड रे पाखरा

उड उड रे पाखरा, उंच उंच गगनात
तुझ्या मनात ताकद ,आता जोड रे पंखात

उड उड रे पाखरा, ने यश दूरदेशी
जरा पेटव दिवटी,तुझ्या घरट्याच्यापाशी

उड उड रे पाखरा, नको होऊस हळवा
अरे तुझ्यासाठी माऊलीनं,पिऊ घेतला वणवा

उड उड रे पाखरा, तुझा तुलाच प्रवास
तुझे पंख जट!युचे, तुला भय रे कशास?

उड उड रे पाखरा, कधी हो तू सूर्याएवढा
तुझी छाया जगावर अन पडो कर्तुत्वाचा सडा

उड उड रे पाखरा,तुझा जन्म उडण्या झाला
आता उगवे पहाट, दूर घनतम सरला

उड उड रे पाखरा, नजरेत माझ्या आशा
तुझ्यासाठी जरि एक,आम्हासाठी दाही दिशा

उड उड रे पाखरा, उंच उंच गगनात
तुझ्या मनात ताकद ,आता जोड रे पंखात

शिकवणी

परवा एक वेगळीच फूटपट्टी मिळाली
त्यामुळे झाला एक नवीनच खेळ सुरू
एकेकाच्या दु:खाची मोजायची फक्त खोली
"भारी-दु:ख-वाल्याची" शोधमोहिम सुरू

सर्वात पहिल्यांदा आपलंच मोजावं म्हटलं
आणि काय सांगू? चांगलं पंचवीस फूट भरलं!!
मग भेटला 'अमक्या', त्याचंही मोजून घेतलं
भलताच कंडम निघाला, दहाच्या पुढे नाही गेलं

ढमक्याचा आकडा मात्र अगदी तिसापर्यंत गेला
ह: दु:खाचा रंग त्याचा अगदिच फिका, सोडून दिला
ओळख-अनोळख झाडून सर्वांची मोजली खोली
पण कोणाचीही 'लेव्हल' आपल्याएवढी नाही भरली

अशीच छाती पुढे काढून मग जगभर हिंडलो
आणि शेवटास एका किना-याला येउन थडलो
समोर पाहतो, तो अथांग विराट समुद्र पसरलेला
त्याक्शणी 'धरतीआई'चा आवाज कानात रुणझुणला

"बेटा, या फूटपट्टीनं का मोजणारेस माझ्या या दु:खाची खोली
आणि कशाला रे मोजायचं? दु:खं तुमची, माझीच ना रे झाली?
लेकरु म्हणुन सांगते ऎक, दु:खाची खोली किती ते नाही बघायचं,
अथांग वाटणा-या दु:खापलिकडेही जमीन असते, एवढं लक्शात ठेवायचं"....

अंकुर

अगदी खोलवर गाडलं गेलेलं

ना हवा, ना पाणी

वरती सग्गळं काही सुरळीत, आलबेल

शंकाही यायला नको त्याच्या अस्तित्वाची....

पण तू परवा जो नांगर फ़िरवलास ना, सगळ्यावरुन!!

कानाकोपरा नाही ठेवलास शिल्लक....

ते जाऊदे, जखम तर नाहीच उरली आता

कोवळे अंकुर बघ कसे आलेत उगवून.........

Friday, February 1, 2008

जन्मखुण

काळ दु:ख करतो हलकं, असं ऐकलं होतं
स्वत: अनुभवायला मिळेल, वाटलं नाही
जखम आयुष्यभर पुरेल असं वाटलं होतं
कुणी आलं रिझवायला जरि,ऐकलं नाही

कळंत गेलं हळू हळू जग आसपासचं
समजलं की लोक घायाळंच जगतायत
माझं माझं म्हणत होतो, ते एवढसं!!
तरि बाकी सग्गळे उमलुन बघतायत

मग काय, जखम होत गेली कोरडी आपोआप
आणि आश्चर्य, मन ओलं होत गेलं अजून
आता व्यथा तेवढी मिळाल्ये खूssप मोठी
पण दु:ख मात्र नाही, फक्त उरल्ये जन्मखुण....

Wednesday, January 30, 2008

शब्दार्थ

शब्दार्थ

एकेका शब्दाशी असं नातं जोडलं होतं म्हणुन सांगू!!

की मृदगंध म्हटल्यावर डोळ्यांनी आपोआप मिटावं
आणि राउळ स्मरल्यावर हातांनी जोडलं जावं

धुकं आठवल्यावर नाकाचा शेंडा ओला व्हावा
'सय' म्हटलं की हृदयात उठावा असा कालवा

आता शब्द नाही वाटत माझे, तिथं नातं कुठलं सांगू?

आता मोहोर आठवुनही मन नाही येत फ़ुलुन
आणि वसंत दाटुन आला तरी जातं कोमेजुन

या सगळ्या द्वंद्वात अपवाद फ़क्त एकाच शब्दाचा उरतो
तुझी एकदा जरी झाली आठवण, जीव कासावीस होतो....